अनपेक्षित घाव (भाग १) - Anpekshit Ghav Part 1

काळोख्या रात्री धडपडत पळत होता,लांबूनच घराचा दरवाजा उघडा दिसला, रागाने लालबुंद झालेल्या अज्याने चाकू बाहेर काढला आणि अर्धवट उघलेल्या दरवाज्यावर लाथ घातली आणि जोराने किंचाळला ....


100 घरांच गाव, तालुका पासून 20 मैल अंतरावर, गावाच्या बाजूने नदीचा कालवा जात होता आणि सदू शेठ ने शासनाकडे विनंती करून त्यातलं काही पाणी गावाकडे आणलं होत, सदू शेठ म्हणजे गावाचा मोठा सावकार, 5-6 गावात त्याच्या जमिनी तसेच पिढी परंपरेने चालत आलेले धंदे. सदू शेठ ला लबराच मान होता,कारण त्यांच्या मुळेच गावची शेती आणि इतर धंदे चांगले चालेल होते.

अजय, म्हणजेच आज्या, पेहलवाना सारख शरीर, अगदी पिळदार, रोजचा व्यायाम आणि सोबत शेताची काम करून, गुरे घेऊन रानावनात हिंडून, शिकारीसाठी दिवस जंगलात राहून कमावलेलं धिप्पाड शरीर, दिसायला देखील देखणा, स्वभाव देखील हसमुख.पण शिक्षण झाले नसल्याने आणि नांगरायला स्वतःची जमीन नसल्याने सावकाराच्या इथे कामाला लागला होता.

त्यामुळे 3-4 गावी जाणं येणं सुरू झालं, सुरुवातीला सावकाराने शेतीची, तसेच सामान पोचवण्याची कामं करून घेतली पण नंतर विश्वास पटल्यावर पैश्यांची देवाण-घेवाण, जमिनीचे सौदे- तंटे अश्या कामांच्या वेळी त्याला सोबत घेऊ लागले. एवढा धिप्पाड गडी आपल्या नक्कीच कामाचा आहे अशी सदू शेठ ची समजूत होती, आणि त्यात आज्या जास्त शिकलाही न्हवता त्यामुळे पुढे जावून तो काही व्यवहारात दगा फटका करेल अस सावकाराला वाटत न्हवत.

आज्या च्या आयुष्यात 2 गोष्टी खूप महत्याच्या होत्या, एक खूप मेहनत करून आई-वडलांची सेवा आणि स्वतःच शरीर.

आज्या स्वतःच शरीर जपत असला तरी त्याच्या आई वडलांनी मात्र पन्नाशी ओलांडली आणि एका मागून एक रोग जडू लागले आणि सर्व प्रकारची दुखणी सुरू झाली होती, आज्या कामामुळे पुरेसा वेळही त्यांना देऊ शकत न्हवता. गावात फिरताना बऱ्याच वडीलधाऱ्या माणसांनी "आज्या लग्न करून घे, आई बापासनी असत सोडून जातोस, ते एकटे असतात". असे सल्ले देऊ लागले होते.

एके दिवशी शेतमाल घेऊन लांब 4 गावापलीकडे जावं लागणार होत, पूर्ण दिवस जाणार होता, आज्याला कामाचा कधीच त्रास न्हवता त्याला आपल्या आई-वडलांची काळजी लागून राहिली होती, गावात असलं की वेळ मिळाली की घरी जाता येत होत, पण आज पूर्ण दिवस जाणार होता आणि उशीर झाला तर दुसऱ्या दिवशी यायला मिळणार होत, त्यामुळे आज्या पहाटे 5 वाजताच गाडीत माल भरून 6 वाजताला जाण्याच्या तयारीत होता, सदू शेठही या खेपेला येणार होते, पण उशिरा निघणार होते,

रस्ते खराब असल्याने गाडी दुपारी शिंपले गावात आली, माल उतरवल्यावर, सर्व मजूर, ड्रायव्हर आणि इतर मंडळींनी एकत्रच जवणे उरकली, शेठ यायला उशीर होता त्यामुळे बाकीची सर्व माणसे पहुडली. सदू मात्र झाडाखाली बसून आपल्या आई वडिलांच्या चिंतेत होता, कामे झाल्यावर घरी निघताना शेठ ला सांगून त्यांच्या गाडीतून लवकर यावे असे विचार त्याच्या मनात येत होते.

सावकाराची गाडी आली, '"आज्या...ये चल सोबत"
असे आवाज ऐकताच आज्या पळत गाडीजवळ गेला, "चल लवकर बैस". आज्याला घेऊन गाडी नारायण शेठ यांच्या कडे निघाली, आज्यालाही ते कळल होत, 2 महिन्यांची थकबाकी होती, शेठ एक फेरी तिथे मारतीलच अस त्याला वाटत होत,

"या सदू शेठ या, बसा बसा" नारायणरावांनी शेठ चे स्वागत केले, सदू शेठ ने वाड्यात प्रवेश केला.
वाडा फक्त २० खोल्यांचा असला तरी खूप जुना होता, बाहेरुन भव्य वाटत होता,
सर्व मंडळी बाहेरूनच  वाड्याची शुभा पाहत  एका शेड खाली बसली आणि व्यवहाराच्या गप्पा सुरू झाल्या, व्यवहाराच्या गप्पा झाल्यावर,
नारायण राव, मध्येच आज्या कडे पाहून म्हणाले " हा कोण पेहलवान ? ".
सदूशेठ : "माझा गडी हाय" ,
राव: " गडी लय ताकदीचा हाय, लगीन झालं की न्हाय?"
शेठ: "न्हाय मुलगी वैगेरे भानगडीत नाही आमचा गडी"
राव: "आमच्या रम्याची (स्वयंपाकी) हाय, लग्नाच्या वयाची
तुमच्या गडयास अगदी साजेशी"

दोन्ही शेठच्या या संभाषणाने आज्या बुचकल्यात पडला, कुठे व्यवहार करायला आलो आणि हे काय मध्येच.

शेठ आज्या ची पाठ थोपटत म्हणाले काय आज्या बघायची का पोर. आज्या ला शेठ बद्दल खुप आदर होता, त्यांना नाही बोलणं जमणार न्हवत,
"जशी तुमची मर्जी" आज्या उत्तरला.
"अहो कमळाबाई रम्याच्या मोठ्या पोरींसनी धाडून द्या. मुलगा आलाय बघासनी.. नटून आणावं म्हणा..."
"व्हय व्हय आलेच म्या ", अस म्हणत कमळाबाई वाड्याच्या मागच्या बाजूने निघून गेल्या.

दोन्ही शेठ ने अस अचानक ठरवल्याने आज्या ची फार गोची झाली होती. आणि त्यातून तो बाहेर पडूही शकत न्हवता.

काही वेळाने मधु (रम्याची मुलगी) हातात कंदापोहे आणि चहा घेऊन आली, आधी दोन्ही साहेबांना दिल, आणि आज्याला देताना तिरक्या नजरेने त्याला पाहून घेतलं.

आज्या मात्र एकटक मधु कडे पाहत होता आणि कांदेपोहे खात होता, त्याला कळतच न्हवत काय बोलावं आणि काय करावं.
मध्यम बांधा, थोडेसे फुगीर गाल, बोलके पाणेरी डोळे आणि चेहऱ्यावर मंद हसू, आज्या हे सर्व आ वासून पाहत होता

तब्बेतीने आज्याला साजेशीच होती,घरकाम आणि स्वयंपाक ती आपल्या बापासोबतच वाड्यात काम करत करत शिकली होती,
काही इयत्ते शाळेत गेली होती पण कामामुळे सोडावं लागलं होत

शेठ: "काय आज्या पोरगी पसंत का?"

सदू शेठ अश्या प्रकारे बोलत होते जणू ते व्यवहार करायला नाही तर आज्या च लग्न जमवायला आले होते, आज्याची बोलती बंद होती. आणि काही वेळ शांततेत गेला.

रावांच्या इशाऱ्यावर कमळाबाई तिला आत घेऊन जात असताना तिने आज्या ला पाहून घेतलं, तिलाही त्याचं ते पिळदार, पेहलवाना सारख शरीर भावलं.तिथून निघताना तिलादेखील  एक वेगळंच समाधान जाणवत होत. आज्याला देखील तो क्षण वेगळा भासत होता.

राव: "सदु शेठ काही घाई नाही तुम्ही गावी जाऊन निरोप पाठवून घ्या, मग पुढे बोलणी होतच राहतील "
शेठ: "हो अगदी बराबर, चला मग आम्ही निघतो"
निघतो हे शब्द ऐकताच आज्या चटकन घराच्या बाहेर आला,
सावकाराने हे काय केलं, आपलं लग्न तर नाही लावणार ना,
मी एक साधा गडी, माझ एवड का म्हणून सावकार बघू लागले आहेत, असे बरेच प्रश्न त्याच्या मनात खेळू लागले. आपल्या शेठ शी कस संभाषण करावं हेच त्याला कळेनासं झालं

गावी निघताना सदु शेठ ने आज्या ला आपल्या सोबत गाडीत बसवलं. लग्नाबद्दल  आणि परवाच झालेल्या त्यांच्या आणि आज्या च्या वडलांच्या भेटीबद्दल देखील सांगितलं,

आज्या वडील सदु शेठ समोर विनवण्या करून सांगत होते, "बिमारी पिछा सोडत नाय, आज्या च लग्न बघून मरावं एवढ आमचं सपाण हाय "

शेठ ने अनेक गड्यांची लग्ने लावून दिली होती, त्यामुळे त्यासाठी ती काही नवीन गोष्ट न्हवती, लग्न लावून दिल की त्या उपकरापायी 3-4 वर्ष तरी गडी सोडून जात न्हवता, हेही त्यामागचं गणित होत.

आज्या ला लग्नासाठी होकार देण्यावाचून काही दुसरा पर्याय न्हवता, आपण नाही बोललो आणि शेठ ला राग आला तर हातच काम जाईल. जर लग्न केलं तर आई वडिलांकडे बघणार कोणी तरी असेल असेही त्याला वाटत होत तसेच मधु देखील त्याला तशी आवडलीच होती, त्याने होकार देताच, पुढच्याच महिन्यात सदूशेठ ने लग्न लावून दिल.

लग्नानंतर 3-4 महिन्यांतच मधू आता आज्याची मधुराणी झाली होती, मधु फक्त 5 इयत्या शिकली होती, पण तिला व्यवहार कळत होता आणि आपल्या नवऱ्याची गरज देखील.त्यामुळे तिने सासू-सासर्यांना काही कमी पडू दिल नाही, आणि आज्याला देखील प्रेमळ आधार दिला. तिच्या येण्याने रोगी घरला जणू नवीन उत्साह मिळाला होता, लग्नानंतर पुढच्या 3 महिन्यातच झोपडीवजा घर आता भक्कम आधारच कौलारू झालं होत.

आपला नवरा पेहलवान सारखा मजबूत आहे आणि दारू पीत नाही वरून आपल्या शरीराची काळजी घेतो आणि साधा सरळ आहे त्यामुळे मधु खुश होती, घरीबीचे चटके सोसायला, मेहनत करायला ती तयार होती कारण तिला आपल्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता.तिला कळत होत आज्याला आई वडलांची खूप काळजी आहे आणि ती गोष्ट खूप महत्वाची देखील आहे.

आज्याच्या लग्नाला 6 महिने व्हायला आले होते, सर्वच सुरळीत होऊ लागलं होत, मधू आणि आज्या खूप आनंदाने संसार करत होते, पण आज्या च्या आई वडिलांनी एकाच दिवशी देह टाकले.

आज्याच सुरळीत चालू आहे हे पाहूनच जणू ते स्वखुशीने झोपी गेले होते.

आज्या खूप दुःखी झाला, ज्यांच्या साठी एवड सर्व करत होता तेच आता नाहीसे झाले होते, सर्व आटापिटा बरबाद झाला. आज्या शरीराने जरी भिप्पाड असला तरी मायेची, प्रेमाची त्याला गरज होती, आई बापाचं सहवास त्याला हवा होता, आता सर्वच नाहीसे झाले होते.

आई बाबांचा फोटो घेऊन तो काही दिवस नुसता रडत होता, 2 दिवस जेवलाही नाही, फक्त आई आणि बाबा च्या नावाने हाका मारत होता, रात्री अपरात्री उठून एकटाच काही तरी बडबडू लागला होता. यात सर्वात भक्कम राहून मधू ने आपली नवऱ्याला साथ दिली,काही दिवस त्याला एका लहान पोरा सारख तिने सांभाळलं.

व्यक्ती कितीही प्रिय असल्या तरी नियतीचा नियम आहे, येणारा तो जाणारच आहे. आपल्या हातात फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे जगणं!

हळू हळू आज्या सावरत होता, मधु देखील घराची आणि त्याची काळजी घेत होती, सावकाराने त्याचं लग्न लावून दिल होतं आणि आई वडील गेल्यावर थोडं कर्ज देखील झालं होत, कितीही दुःखात असलं तरी व्यवहार हा पाळावाच लागतो, त्यामुळे तो कामाला रुजू झाला होता, निराश आणि हताश आज्या फारच अबोल झाला होता, कामातही जास्त मन रमत नसे, नियतीने आपल्या सोबत जे केलं आहे त्याचा राग घेऊन तो आतून तापट असे आणि आपल्या बायकोवर जाऊन सर्व राग काढत. मधु सय्यमाने घेत असे कारण राग शांत झाल्यावर तो बायकोच्या पाया पडून माफी देखील मागत असे, त्याला कळत होत तो चुकतोय पण तो राग अधून मधून बाहेर येत असे.

बाजूच्या गावात सदुशेठ ची 20 ऐकर शेत जमीन होती आणि एक घर देखील होते, काही दिवसांपूर्वी 5-6 घरात एकाच रात्री चोरी झाली तसेच एका सावकाराच्या वाड्यावर सशस्त्र दरोडा पडला होता, त्यामुळे आजूबाजूच्या गावात भीतीच लोन पसरलं,गावात रात्रीचे पहारे सुरू झाले, भीतीचं आणि अफवांचे वादळ पसरलं.

15 दिवस झाले तरी पहारे सुरूच होते,  दरोडेखोर पकडले गेले न्हवते आणि पोलिसांनी देखील गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता, गावातल्याच मंडळींनी आपापल्या सोयीनुसार माणसांचे गट बनवून पहाराच्या वेळा ठरवल्या होत्या त्यानुसार 2 टोळ्या आधीच गावात पहारे देत होत्या.

त्या रात्री आज्या आणि त्याचा शेजारी सदू शेठ च्या वाड्याजवळ गेले, आज्या आणि त्याचे मित्र गावाच्या मधोमध सदूशेठ च्या बंगल्याजवळ पाहऱ्यासाठी एक एक करून जमा होत होते, तेवढ्यात हसमुखरावांचा जुना वडिलोपार्जित वाडा होता, तिथून आवाज ऐकू आले, आणि एक ओरडत ओरडत आज्या च्या टोळी जवळ आला,

"जुन्या वाड्यावर आग लागलीय"
"चला चला....धावा .."

सर्व जण त्या दिशेने धावले, हसमुख रावांचा वाडा सर्वात जुना असल्यानं तो जुना वाडा म्हणून च सर्वांना प्रसिध्द होता, तिथे पोचताच वाड्याला बाजूला पेड्याचे (सुकलेले गवत) मोठे लोन होते त्यांना आग लागलेली दिसली, आग विझवायला सर्व जण धावले, आग आटोक्यात यायला आली होती तेवढ्यात 4-5 जण वाड्याच्या भिंतीवरून पळताना आज्याला दिसले, चोर चोर ओरडत तो त्यांच्या मागे पळत सुटला, त्याचे साथीही त्याच्या मागे पळत सुटले, चोर गावाच्या मधोमध आले, गावाच्या मधून 4 रस्ते जात होते, त्यातल्या एका मार्गाने त्यांचा पाठलाग होत होता, त्यामुळे ते बाकीच्या 3 मार्गांनी वेगळे होऊन पळू लागले, गावकरी देखील त्यांच्या मागे धावू लागले,

आज्या काळोख्या रात्री धडपडत पळत होता,पळत पळत गावाच्या वेशीजवळ पोचणार होता आणि मध्येच त्याला आपलं घर दिसलं, त्यातून धूर येत होता आणि दार उघड दिसल, रागाने लालबुंद झालेल्या अज्याने चाकू बाहेर काढला आणि अर्धवट उघलेल्या दरवाज्यावर लाथ घातली आणि जोराने किंचाळला .....आणि मागून एक वार त्याच्या डोक्यावर बसला...
"आ ..आ ........राणी ...!"


जोराने किंचाळत आणि गिरक्या घेत आज्या जमिनीवर कोसळला.


अनपेक्षित घाव (भाग २)image credit unsplash-logoDaoud Abismail

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या