अजिंक्य (lone survivor) Part 1"हिवाळी संध्याकाळ असल्याने, काळोख लवकरच होणार आहे आणि 2 दिवस झाले पोटात पाणी सोडून दुसरं काही नाहीय, कितीही झोपून राहीलं तरी अन्न हे लागणारच, त्यात कोणते आजार जडले तर जगणं मुश्किल होणार"

अनेक पक्षांचे थवे आकाशात टेहाळत गिरक्या घेत होते, काही परतीच्या मार्गावर होते काही मौज करत होते. थवे खूपच मोठे होते, त्यातले पक्षी कमालीचे लयबद्ध उडत, कधी वर जात तर कधी खाली येऊन गोलाकार कमान बनवून परत उंचावर जात होते.

समोर एक टेकडी दिसली, उंचावर जाऊन आजूबाजूचा प्रेदेश बघूया मग ठरऊया पुढचा मार्ग.

चालता चालता, जवळच छोट्याश्या पाण्याच्या दबक्याजवळ अनेक पक्ष्यांचे थवे जमलेले त्याला दिसले.
त्याने कबुतरांच्या थव्यावर लक्ष ठेवलं, ते जवळच होते आणि बेफिर देखील. एक क्षणही न दवडता मोठा दगड उचलला आणि थव्या च्या दिशेने भिरकावला,

फड-फड, कर्कश आवाज करत सर्व पक्षी आकाशी झेपावले, एक पक्षी मात्र तडफडत होता. त्यास पळत जाऊन उचलले.

"तडफडणारा फक्त तू नाहीस मी सुद्धा आहे, फरक इतकाच की तू शेवटचा तडफडून मरण पावशील आणि मी तडफडून मरून जाण्याची वाट बघतोय."


मांसाहार आवडत नसला, तरी जगणं स्वधर्म आहे, कोणीही तेच करेल आणि तो देखील तेच करत होता. त्याने पक्षाला पाण्याने साफ केले, पिसे उपटली, टोकदार दगडाने पक्षाचे शरीर फाडले, मांसळ भाग जमेल तसा वेगळा केला आणि बाकीचं शरीर लांब फेकून दिल. आग लावून भाजण्यासाठी साधन नाहीय आणि धीर सुद्धा.

मांसाचे तुकडे हळू हळू तसेच जोरात चावून खाऊ लागला. बेचव आणि प्रचंड वास येत असलेलं ते मांस त्याने संपवून टाकलं. वास सहन होत नसल्याने पाण्याने अंग स्वच्छ करू लागला, तो कुबट वास काही जात न्हवता. मग शेवटी माती थोडीशी ओली करून हातापायांवर घासली, आणि परत धुवू लागला. असे अनेक वेळा करून मगच हो वास कमी झाला.

त्या पक्षाने त्याचे पोट थोडं का होईना भरलं होत तसेच अनेक दिवस न धुतलेले शरीर देखील स्वछ केलं होत.

आकाशात तांबूस रंग पसरला, परतीचा सूर्य स्पष्ट दिसत होता,
वातावरणात कमालीची शांतता होती, अधून मधून प्राणी-पक्षांचे आवाज येत होते. पुढची वाट कुठे नेईल ठाऊक नाही, ही जागा ओसाड आहे, जंगली गवताचे अथांग रान पसरलं आहे, दुर्मिळ ठिकाण,गावापासून लांब आहे,

थंडीत इथे कोणी फारस फिरकत नाही, हे तो आधीच जाणून होता पण या ठिकाणी कधी यायला मिळालं न्हवतं.

"आजच्या लगबगीच्या दुनियेत विचारांची खोकी बनली आहेत, त्या खोक्यात मला जागा नाही, मात्र इथे कुणावरही कसलं बंधन नाहीय, वारा सैराट पळतोय, पक्षी खेळत आहेत, प्राणी त्यांच्या कामात स्वस्त आहेत, माळरानं डोलत आहेत, मोठी झाडे गंभीर वाटत असली तरी कोणास त्रास देऊन नियम पाळण्यास सक्ती करत नाही आहेत. इथे पैसा, सत्ता आणि प्रसिद्धीसाठीचा कोणता संघर्ष देखील नाहीय! पण......."

इथे संघर्ष आहे तो अस्तीत्वाचा!

रात्री राहण्यासाठी जागा मिळावी म्हणून टेकडीवर जाऊन चारी बाजूंना पाहू लागला, उत्तरेला गवताचे मोठे ढीग कापून बांधून ठेवलेले दिसले, तीच जागा अधिक सुरक्षित आहे असे त्याला वाटले.

"पाण्याच्या ठिकाणी झोपलो तर रात्री साप, हिंस्र जनावरं तेथे येऊ शकतात, गवतात तर सापांचा सुळसुळतच असतो, आणि अंगाला खाज वैगेरे देखील लागू शकते"

हातात एक काठी आणि टोकदार दगड अशी हत्यारं घेऊन तो उत्तरेला चालत सुटला.

जंगली गवत सुकवून त्याचे मोठे ठोकळे बनवलेले आणि एकावर एक रचलेले होते, 10-12 फूट पर्यंत उंच 5 ठोकळे रचले होते आणि त्याच्या मध्य भागी कुंपणात पत्र्याच्या शेड चे खुराटे दिसले.

काठीने काटेरी कुंपण बाजूला सारत आत आला, छोटी पत्र्याची शेड, 3 बाजूंनी भिंत आणि पुढे दरवाजा, त्यात पूर्ण सुकलेल गवत ठेवलं होत, तो परत बाहेर आला आजू बाजूला फेऱ्या मारून पाहू लागला कोणी मनुष्य राहावयास आहे का?

काही वेळ असच फेऱ्या मारून तो आत शिरला, खाद्यावरची बॅग खाली ठेवली, सुके गवत बाजूला सारत, झोपण्यासाठी जागा केली.दरवाज्याला कडी लागत नाहीय, तो सतत उघडतोय म्हणून दगडाची चिप्पी फटी मध्ये फसवली.

आता तो निवांत झोपू शकत होता, त्याने उशाला बॅग घेतली आणि थकलेला देह गाढ झोपी गेला.


Image Credits

unsplash-logoNijwam Swargiary

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या